चिन्मय मांडलेकर या अभिनेत्याने
फेसबुकवर लिहिलं होतं की तो काम करत असलेल्या ‘ मिस्टर आणि मिसेस ’ या नाटकाच्या प्रयोगाच्या
दरम्यान अश्लील शेरेबाजी झाल्याने तो प्रयोग मध्यातच थांबवावा लागला. विशेष म्हणजे
हा प्रयोग पुण्यात होता आणि त्याहूनही विशेष म्हणजे वकिलांसाठी लावलेला हा प्रयोग होता!
देशाच्या ‘सांस्कृतिक राजधानी’
मध्ये न्याय मिळवून देणाऱ्यांनी असं करावं ही किती घृणास्पद बाब आहे!
त्यानंतर त्या संघटनेच्या प्रमुखांनी
अशीही वक्तव्यं केली की प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या नाटकाच्या निर्मात्याने आणि संघाने
हे पाऊल उचललं! यावर तर माझा पूर्णपणे विश्वास नाही, कारण नाटकाच्या १५२व्या प्रयोगाला
अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवायची काहीच गरज नसणार. ज्या अर्थी त्या नाटकाने १५० हून
अधिक प्रयोग केले आहेत, त्या अर्थी ते नीट चाललंय. बाकी, मी संतोष कणेकर (निर्माता)
ला वैयक्तिक ओळखतो आणि तो किती निष्ठेने नाटक करतो हे माहितीये, हा भाग वेगळा.
या अशा प्रसंगातून माझा संघ आणि
मी पण काही वेळा गेलोय. त्यातला एक प्रसंग तर प्रकर्षाने आठवतोय. अशाच एका कार्यक्रमासाठी
काही वर्षांपूर्वी ‘ लूझ कंट्रोल’ या नाटकाचा प्रयोग एका संस्थेने आयोजीत केला होता.
खरंतर त्या दिवशी चार पैकी एका कलाकाराला जमणार नव्हतं म्हणून आम्ही प्रयोग करायला
नकार दिला होता. पण त्यांनी फारच आग्रह केल्यामुळे आम्ही एका बदली कलाकाराला घेऊन प्रयोग
करायचं ठरवलं. आपलं नाटक व्हावं यासाठी इतका आग्रह होत असल्याकारणाने कुठेतरी आम्हाला
ही बरं वाटत होतं, त्यामुळे आम्ही पण पहिल्यांदा बदली कलाकार घेऊन प्रयोग करायला होकार
दिला होता.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
सांगतो की ‘लूझ कंट्रोल’ हे जवळ जवळ १० वर्षांपूर्वी, म्हणजे २००५ साली आलेलं नाटक
आहे. त्या काळासाठी त्या विषयावर नाटक करणं जरा वेडेपणाचं आणि धाड्सचं होतं. पण आम्ही
१८ वर्षांचेच असल्यामुळे तो आमच्यालेखी ना वेडेपणा होता ना धाडस. आम्हाला वाटत असलेल्या
भावना नाट्यपूर्ण पद्धतीने मांडण्याचा तो प्रयत्न होता. तर, त्या नाटकमध्ये तीन नुकतेच
वयात आलेले तरूण मुलींबद्दल आणि सेक्सबद्दल त्यांना काय वाटतं ते बोलून दाखवतात. मी
त्या नाटकाचा भाग होतो म्हणून म्हणत नाही, पण नाटकात कुठेही अश्लील शब्द, हाव- भाव
नव्हते. पात्रांच्या खऱ्या वाटणार्या संवादातून, अभिनयतून आणि एकंदरीत नाटकातल्या प्रसंगांमुळे
विनोद निर्मिती व्हायची, जी बहुतांश लोकांना आवडायची.
असो!तर त्या दिवशीचा प्रयोग आमच्यामते
व्यवस्थित चालला होता. आणि प्रयोग करता-करता विंगेतून एकदम मोठे आवाज आले. प्रयोग सुरु
असताना अजून कुठे लक्ष द्यायचं नाही म्हणून आम्ही तन्मेयतेने प्रयोग सुरु ठेवला.शेवटी
विंगेतला आवाज इतका वाढला की प्रयोग थांबवावा लागला.त्या कार्यक्रमाचे आयोजक घाबरून,धावत
आत आले होते.त्यांचाच धावण्याचा आणि बोलण्याचा आवाज होता!त्यांच्यामते प्रेक्षकांना
नाटक अश्लील वाटत होतं आणि प्रयोग बंद करायला त्यांना आत पाठवलं होतं.आता तेच आयोजक
असल्यामुळे आमच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता.म्हणून प्रेक्षकांना सांगायला एक सहकारी
आणि मी स्टेजवर गेलो. जेव्हा ‘ प्रयोग थांबवत आहोत ’ असं सांगितला तेव्हा बराच आरडा
ओरडा झाला आणि आंधारातून असे आवाज येऊ लागले की ‘ ज्यांना नाटक बघायचं नाही त्यांनी
बाहेर जा, ज्यांना बघायचा आहे त्यांना बघू द्या’. हा अजून मोठा आवाज ऐकल्याने आयोजक
अजूनच घाबरले!शेवटी त्यांना काहीच निर्णय घेता येत नाही हे पाहून आम्हीच तो निर्णय
प्रेक्षकांवर सोडला, त्यांनीच दिलेल्या तोडगा वापरून – ‘ ज्यांना बघायचं नाही त्यांनी
बाहेर जा’. खरं सांगतो, पहिल्या रांगेतली फक्तं ४ लोकं उठून गेली!त्यानंतर प्रयोग करायला
वेगळीच मजा आली ज्याचं मी शब्दात वर्णन पण कारू शकत नाही!
तर त्या दिवशीच्या प्रेक्षांनीच
सुचवलेला मार्ग किती चांगला आणि सोप्पा होता!आवडत नसेल तर बघू नका!मला असं खूपदा वाटता
की आतमध्ये प्रत्येक माणसाला कुठेतरी वाटत असतं की आपल्याला नाव आणि प्रसिद्धी मिळावी.त्यामुळेच
TV चा कॅमरा दिसला की सगळे जण गर्दी करतात, त्याच्यासमोर यायचा प्रयत्न करतात.तसंच
हे शेरेबाजीचं असणार!लोकांनी समोर जे चाललं आहे ते सोडून आपल्याकडे बघावं, आपल्या
‘डायलॉग’ वर हसावं. आपलं वागणं उपद्रवी आहे हे त्यांना त्यावेळी समजत नसावं.किंवा समजत
असल्यास, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची गरज अधिक तीव्र असावी.चित्रपट बघतानाही याचा
अनेकदा प्रत्यय येतोच की!इतर प्रेक्षकांना त्याचा त्रासही होतो.फक्त नाटक करताना त्याचा
त्रास सर्वात जास्ती कलाकारांना होतो.आपलं खरं आयुष्य - चांगलं असो किंवा वाईट – बाजूला
ठेवून तिकडे तो एक दुसरा माणूस बनून नाटक सादर करत असतो.या कारणांमुळे त्याच्या एकाग्रतेला
नक्की धक्का बसतो आणि प्रयोग हलतो.
आत्मिक समाधानासाठी असा समोरच्याची
समाधी भंग करण्यापेक्षा उठून गेलेलं कधीही बरं! तसंच चार लोकांना आवडत नसेल, प्रक्षोभक
वाटत असेल तर ते उरलेल्या पाचशे जणांनी पण पाहू नये हा अट्टाहास का आहे?शांतपणे सगळे
कारभार झाले तर या अशा लोकांचं काहीतरी अडत असणार, हेच समाधानकारक उत्तर! 'मी किती
महत्वाचा, माझं मत किती महान' ही त्यामागची भावना!
माझा एक मित्र रात्री उशिरा मुंबईहून
पुण्याला येत असताना, बस चालकाबरोबर भांडण झाल्यामुळे एका मोटार गाडीने ती बस रस्त्यात
थांबवली आणि एका हातोड्याने बसचे दिवे फोडून तो पटकन निघून गेला.दिवे नसल्याने पुढची
बस येईपर्यंत जवळ जवळ २ तास तिकडे सगळे प्रवासी खोळंबलेले. त्या मोटर चालकाची वृत्ती
आणि या अशा प्रेक्षकांमध्ये काय फरक?गुंडच दोघेही!
आणि या सगळ्यात मी मोबाईल फोनमुळे
होणाऱ्या त्रासाबद्दल बोलणार पण नाहीये.कारण ती लोकं माझ्यामते पूर्णपणे नालायकाच!त्यांनी
घरी बसून TV बघावा, म्हणजे अजून कोणालाही त्रास होणार नाही.